- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर-बार्शी महामार्गावरील वैराग नगरपंचायत हद्दीत पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा बुधवारी सकाळी काढण्यात आला. येत्या २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास हाच मोर्चा मुंबईला घेऊन जाणार असल्याचे मराठा समाज आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मागील काही दिवसांपासून वैराग येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ४० दिवसांपासून साखळी आंदोलन सुरू आहे. याच साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. याशिवाय ट्रॅक्टर मोर्चा हा मुंबईपर्यंत काढण्यात येणार आहे, त्यासाठीही आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केला आहे. या मोर्चा बार्शी तालुक्यातील ५२ गावातील समाजबांधव सहभागी झाले होते. या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनामुळे वैराग शहरातील वाहतुक विस्कळीत झाली होती. त्यामुळे बार्शीला जात असलेल्या वाहनधारकांना वाहतुक कोंडीचा फटका बसला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.