- राकेश कदम सोलापूर - महापालिकेने बुधवार पेठेतील उद्यानात विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा पुतळा उभारला. या पुतळा परिसराच्या सुशाेभिकरणासाठी काेट्यवधी रुपये खर्च केले. ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आराेप आंबेडकर उद्यान कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. ठेकेदारावर कारवाई न झाल्यास आंदाेलन करू असा इशारा दिला.
कृती समितीचे प्रमुख अशाेक जानराव आणि सहकाऱ्यांनी गुरुवारी मनपा उपायुक्त आशिष लाेकरे यांना निवेदन दिले. जानराव म्हणाले, आंबेडकर उद्यानात पुतळा परिसराच्या सुशाेभिकरणासाठी १ काेटी ३० लाख रुपयांचा खर्च हाेत आहे. बाबासाहेब आणि माता रमाईचा पुतळा उभारण्यासाठी केलेला चबुतरा व इतर कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. या कामांसाठी ८५ लाख रुपये अदा केले आहेत. मनपा अधिकाऱ्यांनी कामाची पडताळणी न करताच पैसे अदा केले. त्यामुळे त्यांचीही चाैकशी झाली पाहिजे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्यानात येउन या कामांची पाहणी करावी. भीमसैनिकांचा संताप वाढत आहे. तत्पूर्वी काळजी घ्यावी, असा इशाराही जानराव यांनी दिला.