सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविणाºया उमेदवारांसाठी चिन्ह निश्चित करण्यात आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धरामेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलमधील उमेदवारांना कपबशी हे चिन्ह मिळाले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह सिद्धेश्वर शेतकरी विकास आघाडीतील उमेदवारांना शिवण यंत्र हे चिन्ह देण्यात आले. सर्वपक्षीय बाजार समिती बचाव पॅनलला नारळ चिन्ह मिळाले आहे.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. निवडणुकीच्या रिंगणात एकूण ८१ उमेदवार आहेत. या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनलमध्ये लढत होत आहे. पॅनल प्रमुखांनी बुधवारी चिन्हांची मागणी केली होती. सहकारमंत्री देशमुख गट आणि महाआघाडीच्या नेत्यांनी प्रथमत: कपबशी या चिन्हाला प्राधान्य दिले होते. सहकारमंत्री गटाचा अर्ज प्रथम दाखल झाला. महाआघाडीचा अर्ज पोहोचण्यास उशीर झाला. सर्वपक्षीय बाजार समिती बचाव पॅनलच्या उमेदवारांनीही दाखल केलेल्या अर्जानुसार नारळ चिन्ह देण्यात आले.
अप्पांना ‘स्टुल’, चाकोतेंना ‘विमान’- मुस्ती गणातून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणाºया माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना स्टुल हे चिन्ह मिळाले आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात मैदानात उतरलेले सिद्धाराम चाकोते यांना विमान हे चिन्ह देण्यात आले आहे. इतर अपक्ष उमेदवारांना ढाल-तलवार, दूरदर्शन संच, छताचा पंखा, आॅटो रिक्षा, फावडे आदी चिन्हे देण्यात आली आहेत.
ना खर्चाचे बंधन, ना प्रशासनाचा धाक- बाजार समिती निवडणूक कायद्याने निवडणुकीची विशेष अशी आचारसंहिता जाहीर केलेली नाही. उमेदवारांवर खर्चाचे बंधन नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियमानुसार बँक खात्यातून खर्च, निवडणूक खर्चाचा तपशील आदींचेही बंधनही घालण्यात आलेले नाही. एकूणच निवडणूक प्रक्रियेवर प्रशासनाचे फारसे बंधन दिसत नाही. त्यामुळे या निवडणुकीत पैैशाचा चुराडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इटकळे, उंबरजे यांना बॅटरी टॉर्च- व्यापारी मतदारसंघातील बसवेश्वर इटकळे आणि केदार उंबरजे हे आमचे उमेदवार असल्याचा दावा महाआघाडीने केला होता. परंतु, इटकळे आणि उंबरजे यांना बॅटरी टॉर्च हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याचे सांगण्यात आले. सिद्धाराम कोतली यांना गाजर, म. इब्राहीम मैंदर्गीकर यांना अंगठी, सिद्रामप्पा हुलसुरे यांना विमान चिन्ह मिळाले आहे. हमाल-तोलार मतदारसंघातील उमेदवारांना अंगठी, काचेचा पेला, गणक यंत्र, इस्त्री, शिट्टी अशी विविध चिन्हे देण्यात आली आहेत.