सोलापूर: बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींचे मानधन तसेच संचालकांचा दैनिक भत्ता दुपटीने वाढला असून, त्याची अंमलबजावणी या महिन्यापासून सोलापूरबाजार समिती करणार आहे. याशिवाय कामकाजाच्या सोयीसाठी विविध उपसमित्या नेमण्यावर बैठकीत निर्णय होणार आहे.
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची सभा शनिवार दिनांक १६ मार्च रोजी होणार असून सभेपुढे ३८ विषय ठेवण्यात आले आहेत. बाजार समितीच्या सभापतींना दरमहा ५ हजार व उपसभापतींना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते. पणन संचालकांनी यात दुप्पट वाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता सभापतींना दरमहा १० हजार व उपसभापतींना ५ हजार रुपये मानधन देण्यास मंजुरीसाठी विषय ठेवला आहे, संचालकांना सभेसाठी दैनिकभत्ता आतापर्यंत ३०० रुपये, उपस्थिती भत्ता २७५ रुपये व प्रवास भत्ता एसटी तिकिटाच्या तिप्पट दिला जात होता.
नव्या आदेशानुसार संचालकांना दैनिक भत्ता ६०० रुपये उपस्थिती भत्ता ३७५ मिळणार असून प्रवासभत्ता मात्र पूर्वीप्रमाणेच मिळणार आहे. बाजार समितीच्या कामकाजाच्या सोयीसाठी संचालकांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रकारच्या उपसमित्या नेमण्याचे पणन खात्याचे आदेश आहेत. त्यानुसार समित्या नेमण्याचा विषयही शनिवारी होणाºया सभेसमोर होणार आहे. पणन खात्याच्या नियमानुसार उपसमित्या नियुक्त करण्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांनीच पत्र दिल्याने हा विषय सभेसमोर ठेवला आहे. या विषयाला मंजुरी मिळाली तर संचालकांच्या अध्यक्षतेखालील समित्यांना विविध विषयांना मंजुरी देण्याचे अधिकार मिळणार आहेत.
शेतकºयांना औषधोपचारासाठी मदत..
- - संचालक मंडळाच्या मागील पाच वर्षांच्या कालावधीत कार्यक्षेत्रातील शेतकºयांना औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी मदत देणे बंद केले होते. याकडे संचालक मंडळाने गांभीर्याने पाहिले नसल्याने शेतकºयांनी अर्ज करुनही मदत मिळाली नव्हती. आता अशा प्रकारची मदत देण्यास सुरुवात केली असून येत्या बैठकीत शेतकºयांच्या अर्जावर निर्णय होणार आहे.
विषयपत्रिकेत अर्धवट विषय
- - सोलापूर बाजार समितीच्या सभेसाठीच्या विषयपत्रिकेत औषधोपचार, आॅपरेशनसाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आलेल्या अर्जांचा विचार करणे असा उल्लेख आहे. अर्ज शेतकºयांचे,कर्मचाºयांचे की अन्य कोणाचे हे स्पष्ट होत नाही. पणन संचालकाकडील अपिलाचा उल्लेख करुन दोन विषय ठेवले असून त्यात कोणाचे अपिल हे स्पष्ट होत नाही. असे अनेक विषय अर्थबोध न होणारे आहेत.