सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात व सेसमध्ये मोठी वाढ झाली असून, बाजार समितीला केवळ सेसमधून मागील वर्षीपेक्षा यावर्षी ५ कोटी ७७ लाख ५३ हजार ८३७ रुपये अधिक मिळाले असल्याची माहिती प्रशासक सुरेश काकडे व सचिव मोहन निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सरत्या आर्थिक वर्षात एकूण २१ कोटी ५१ लाख ४८ हजार १०४ रुपये इतके उच्चांकी उत्पन्न मिळाले असून, आजवरचा बाजार समितीच्या स्थापनेपासूनचा इतिहास मोडीत काढत सेसही १६ कोटी ४१ लाख ४५ हजार ८७२ रुपये इतका मिळाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आॅक्टोबर २०१६ पासून प्रशासक नियुक्त आहे.
चालक मंडळ असताना २०१५-१६ मध्ये आलेल्या उत्पन्न व सेसपेक्षा प्रशासक असताना १६-१७ यावर्षी उत्पन्न व सेसही कमी मिळाला होता. मागील वर्षी प्रशासक असताना कमी उत्पन्न व सेसही कमी मिळाला असताना यावर्षी मात्र उत्पन्नात व सेसमध्ये तब्बल सहा कोटींनी वाढ झाली आहे. पत्रकार परिषदेला दत्तात्रय सूर्यवंशी, विनोद पाटील, एस.ए. राजमाने, ए.एम. बिराजदार आदी उपस्थित होते.सेसला बसला फटका
- - २०१४-१५ यावर्षी सोलापूर बाजार समितीला १७ कोटी २० लाख १८ हजार ५९ रुपये उत्पन्न व १२ कोटी १५ लाख ६९ हजार ७४४ रुपये सेस मिळाला होता.
- - १५-१६ या आर्थिक वर्षात १८ कोटी ४६ लाख ८२ हजार १५४ रुपये उत्पन्न व १३ कोटी एक लाख ९९ हजार ६५३ रुपये सेस मिळाला होता.
- - १६-१७ या आर्थिक वर्षात १६ कोटी १३ लाख ४० हजार ७१७ रुपये उत्पन्न व १० कोटी ६३ लाख ९२ हजार ३५ रुपये सेस मिळाला होता.
- - २०१७-१८ या आर्थिक वर्षात २१ कोटी ५१ लाख ४८ हजार १०४ रुपये उत्पन्न तर सेस १६ कोटी ४१ लाख ४५ हजार ८७२ रुपये सेस मिळाला आहे.
मग..पैसे गेले कुठे...?
- - संचालक मंडळ असताना १५-१६ यावर्षी उत्पन्न १८ कोटी ४६ लाख व सेस १३ कोटी मिळाला तर प्रशासक असताना १६-१७ मध्ये उत्पन्न १६ कोटी १३ लाख व सेस १० कोटी ६३ लाख मिळाला. यावर्षी प्रशासकच असताना उत्पन्न २१ कोटी ५१ लाख व सेस १६ कोटी ४१ मिळाला. मागील वर्षी प्रशासक असताना कमी उत्पन्न व सेस मिळाला, मग पैसे गेले कुठे..?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी जादा सेस मिळाल्याचे सातत्याने सांगितले जात होते.