- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : एमबीआर जुळे सोलापूर एसएसआर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत स्काडा प्रणालीकरिता मीटर व व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्या भागातील पाइपलाइनमधील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज बुधवार, २१ डिसेंबर रोजी ३० तासांचा शटडाऊन महापालिकेच्या वतीने घेण्यात येणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने आयुक्त शीतल तेली-उगले यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. शहरात तीन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड तर हद्दवाढ भागात होणारा चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा तीन दिवसांआड करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजन आखण्यात येत आहे. स्काडा प्रणालीमुळे पाण्याचा वेग, प्रेशर, गळती व अन्य बाबी समोर येणार आहेत. त्या आल्यावर योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेला सोपे होणार आहे. त्यासाठी २१ डिसेंबर रोजी शटडाऊन होणार आहे. या कामामुळे पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने २१ आणि २२ डिसेंबर रोजीचा काही भागातील पाणीपुरवठा एक रोटेशन पुढे जाणार असून उशिरा, कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता यांनी केले आहे.