सोलापूर : सोलापूरपुणे तसेच विजयपुर महामार्ग सहा पदरी करणे, नवीन मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजुरी देणे, सोलापूर शहरातील उड्डाणपुलांना मंजुरी देणे, मार्केट यार्ड समोरील बाजूस उड्डाणपूल करणे आदी मागण्या तात्काळ मंजूर करण्याची मागणी खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी केंद्रीय रस्ते विकास, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्यानंतर लवकरच सोलापूर जिल्ह्यातील सर्वच रस्ते कामांना मंजूरी देण्यात येईल असा शब्द गडकरी यांनी दिल्याचे खासदार महास्वामी यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग संबंधित महाराष्ट्र राज्यातील प्रश्न, प्रस्ताव जाणून घेण्यासाठी आयोजित महाराष्ट्र राज्यातील सर्व खासदारांची बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी केंद्रीय रस्तेविकास, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ह्या मागण्या केल्या. यामध्ये, सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील कुंभारी जवळ कर्दळी फाटा येथे पूल किंवा बोगदा बांधणे. 13 मैल मंद्रूप कंदलगाव मोहोळ राज्य महामार्ग 202 चौपदरीकरण मंजूर करावे. सोलापूर सांगली महामार्गावरील मौजे तिरे येथे रस्ता बोगदा बांधणे आवश्यक आहे.
दरम्यान, सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्यासाठी मंजुरी मिळणे आवश्यक आहे. सोलापूर - विजापूर राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी मंजूर करावा. सोलापूर शहरातील बोरामणी नाका ते पत्रकार भवन आणि जुना पुणे नाका येथील पत्रकार भवन या दोन उड्डाणपुलांना मंजुरी देण्यात यावी. सोलापूर शहरातील मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पूल तात्काळ मंजूर करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याबाबत काही मागण्यांवर संबंधित विभागास सर्वे करण्यास सांगितले आहे. तर अन्य मागण्या लवकरच पूर्ण करू असे केंद्रीय रस्ते विकास, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याचे खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींनी सांगितले.