- काशिनाथ वाघमारेसोलापूर - रिक्षा घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन यावेत म्हणून सासरच्या मंडळींनी छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरी-चिंचवड येथे वाल्हेकरवाडीत सासरी ही घटना घडली. याबाबत पत्नी निकिता संतोष खाडे (वय २३, रा.वाल्हेकरवाडी, पिंपरी-चिंचवड, पुणे, सध्या रा. धोत्रे, ता.बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. पती संतोष दत्तात्रय खाडे, सासरे दत्तात्रय दामोदर खाडे, सासू पार्वती दत्तात्रय खाडे, दीर प्रवीण दत्तात्रय खाडे (रा. पिंपरी-चिंचवड, पुणे), असे गुन्हा नोंद झालेल्या सासरमधील व्यक्तींची नावे आहेत.
निकिता खाडे हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २८ नोव्हेंबर २०२१ रोजी तिचा विवाह संतोष दत्तात्रय खाडे सोबत झाला. लग्नानंतर तीन महिने तिला व्यवस्थित नांदवले. त्यानंतर पती, सासू-सासरे, दीर यांनी दिसण्यास चांगली नाही. स्वयंपाक येत नाही. तोंड वाकडे आहे व नवीन रिक्षा घेण्याकरता माहेरून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण करून छळ केला. त्यानंतर तिला माहेरी आणून सोडले. गरिबीतील आई-वडिलांनी नातेवाइकांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे घेऊन आली तरच नांदवणार असे सांगितले. या सर्व त्रासाला कंटाळून तिने पोलिसात धाव घेतली. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल समाधान खांडेकर करत आहेत.