सोलापूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २६ आणि २७ डिसेंबर रोजी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दोन्ही मतदारसंघातील बूथ यंत्रणा, संघटनात्मक कामांचा आढावा घेणार असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले.
भाजपाच्या शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी सायंकाळी पक्ष कार्यालयात झाली. यावेळी पक्षाचे सोलापूर लोकसभा प्रमुख विक्रम देशमुख, शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर, पांडुरंग दिड्डी, विशाल गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
काळे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निश्चित झाला होता. परंतु, नागपूर हिवाळी अधिवेशानासाठी भाजपाचे जिल्ह्यातील सर्व आमदार जाणार होते. या कारणास्तव हा दौरा रद्द झाला. हा दौरा मंगळवार २६ व बुधवार २७ डिसेंबर रोजी निश्चित झाला आहे.
भाजपाने बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी वॉरियर्स नेमले आहेत. या वॉरियर्सच्या कामांचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सोलापुरात येत आहेत. भाजपाचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार निश्चित नाही हे खरे आहे. मात्र पक्ष हाच उमेदवार मानून आम्ही कामाला लागलो आहोत, असे काळे यांनी सांगितले.