- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - मुंबईतील चिनी कॉन्सिल जनरल काँग शियानहुआ यांनी नुकतीच एक घोषणा केली होती. या घोषणेनुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी व चर्चा करण्यासाठी चीनचे एक शिष्टमंडळ आज सोलापूर महापालिकेत दाखल झाले होते. त्यांनी आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करून ‘‘डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूल’’ची स्थापना करण्याचे ठरविले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ, आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या चर्चेत सोलापूर महानगरपालिकेची १७०० विद्यार्थी असलेली एक शाळा दत्तक स्वरूपात डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूलला देण्यात येणार आहे. या शाळेत सेवासुविधा पुरविणे, साधनसामुग्री पुरविणे व अन्य बाबींची नव्याने निर्मिती करण्याबरोबरच विद्यार्थी केंद्रबिंदू मानून गुणवत्ता वाढविण्यासाठी चीनचे शिष्टमंडळ काम करणार आहे. डॉ. कोटणीस यांनी सीमेवर काम केले आणि सुमारे ८०० जखमी सैनिकांना वाचवले. नंतर त्यांनी एका चिनी परिचारिकेशी लग्न केले आणि त्यांना १९४२ मध्ये एक मुलगा झाला. तथापि, प्रतिकूल हवामानाचा डॉ. कोटणीस यांच्यावर परिणाम झाला आणि १९४२ मध्ये त्यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झाले. यावर्षी ३० ऑगस्ट रोजी कम्युनिस्ट नेते माओ त्से तुंग यांनी अनेक दशकांपूर्वी लिहिलेली स्तवन सोलापूर येथील डॉ. कोटणीस मेमोरिअल हॉलमध्ये भारतीय डॉक्टरांनी चिनी लोकांना दिलेल्या त्यांच्या सेवेबद्दल फलक लावण्यात आले.
दोन विद्यार्थी घेणार दत्तकवैद्यकीय शिक्षणासाठी सोलापुरातील दोन विद्यार्थी दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांना चीनमधील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीची नियमावली महापालिका प्रशासन तयार करीत असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
महापालिकेचा एक प्रस्ताव...डॉ. कोटणीस यांचे वैद्यकीय कार्य वर्षांनुवर्षे लक्षात रहावे, यासाठी चीनच्या शिष्टमंडळाने सोलापुरातील एक वैद्यकीय आस्थापना म्हणजेच हॉस्पिटल, डायलेसिस सेंटर, नागरी आरोग्य सुविधा केंद्र दत्तक स्वरूपात घ्यावे, यासाठीचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चीनच्या शिष्टमंडळासमोर ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.