राजकुमार सारोळे
सोलापूर : सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या विधानसभेपेक्षा यावेळेस ३.९४ टक्क्याने मतदानात घट झाली आहे. पिण्याच्या व पावसाच्या पाण्याच्या समस्येमुळे हा फटका बसला असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळेस म्हणजे सन २०१४ मध्ये ५६.४० टक्के मतदान झाले होते. पण यावेळेस ५२.४५ टक्केच मतदान नोंदले गेले. मतदानादिवशी झालेल्या पावसाचा मतदानाला फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. शहर उत्तर मतदारसंघात पावसाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोलापुरात जोरात पाऊस झाला तर शेळगीनाला व इतर परिसरात पावसाचे पाणी घरात जाते. यंदा ही समस्या वारंवार उदभवली. मतदानाच्या आदल्या रात्री झालेल्या पावसाने अनेक नगरातील घरात पाणी शिरले. मतदान केंद्रेही पाण्यात होती.
शेळगी, जुना बोरामणीनाका, मुकुंदनगर, शाहीरवस्ती, भवानीपेठ, मुरारजीपेठ या भागात ही समस्या जाणवली. त्यामुळे अनेक लोक मतदानासाठी बाहेर पडले नसल्याचे चित्र दिसून आले. त्याचबरोबर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उजनी धरण भरलेले असताना शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबतही लोकांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
या मतदारसंघात भाजपतर्फे निवडणूक लढविणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे, बहुजन वंचित आघाडीचे आनंद चंदनशिवे यांच्यात लढत झाली. देशमुख व सपाटे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. चंदनशिवे निवडणुकीचा पहिला अनुभव सांगताना म्हणाले, महापालिकेपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. १२ दिवस दररोज १0 किलोमीटर पायी प्रवास केला. अनेकांना भेटलो. लोकांच्या अपेक्षा साध्या आहेत. पाणी, रस्ता, ड्रेनेज आणि स्ट्रिटलाईट या मूलभूत गरजांच्या अपेक्षा लोकांनी व्यक्त केल्या. महिलावर्ग पोटतिडकीने समस्या मांडताना दिसले.