सोलापूर : कुमठा नाका येथून लेप्रसी कॉलनी पर्यंत पाठलाग करून पोलिसांनी साडे पाच लाखाचा गुटखा पकडला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनेद जावेद बागवान (वय २५ रा. विडी घरकूल रिक्षा स्टॉप जवळ सोलापूर), गौस अलीम शेग (वय ३२ रा. एजाज सायकल दुकान समोर पेंटर चौक सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बेकायदा गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती सदर बझार पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या वतीने सोमवारी सकाळी ७ वाजता सत्तर फुट रोड येथील एका दुकानासमोर सापळा रचण्यात आला. तेव्हां एक चार चाकी वाहन (क्र.एम एच १३ ए सी ७५५६) कुमठा नाका येथून येताना दिसून आली. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी वाहनाला थांबवण्याचा इशारा केला मात्र चालक न थांबता लेप्रसी कॉलनीच्या दिशेने गाडी वळवली. चालक थांबत नसल्याचे पाहून पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. शेवटी वाहनाला लेप्रसी कॉलनी जवळील कचरा डेपो जवळ वाहन आडवले.
वाहनातील दोघांना ताब्यात घेतले व पाठीमागे पहाणी केली असता त्यांना त्यात पंधरा पोते आढळून आले. पोत्यामध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आले. गाडी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयासमोर हजर केले. तेव्हां चार चाकी वाहनात रजनीगंधा पानमसाला, हाय गुटखा, व्ही.१ तंबाखू, विलायची सुपारी असे अपायकारक पदार्थ मिळून आले. या प्रकरणी दोघांविरूद्ध भांदवि कलम १८८, २७२, २७३, ३२८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकूश शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडूकर, सहायक पोलीस आयुक्त डाॅ.प्रिती टिपरे, पोलीस नीरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळूंके, पोलीस नाईक राहूल आवारे, सागर सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडूरे, नितीन गायकवाड यांनी पार पाडली.
गुटख्याची बेकायदा विक्री वाढली
० महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू विक्रीवर बंदी आहे. असे असताना चोरून गुटखा विक्री सर्वत्र सुरू आहे. हा गुटखा कर्नाटक राज्यातून येत असून तो चोरट्या मार्गाने शहरात दाखल होतो. याची सर्वत्र बेकायदा विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.