शीतलकुमार कांबळे, सोलापूर : दिवाळीमध्ये देशभरासह सोलापूर शहरात प्रदूषण वाढले आहे. शहराचा प्रदूषण इंडेक्स हा 200 च्यावर गेला आहे. त्यामुळे प्रदूषित हवेच्या जास्त वेळ संपर्कात राहिल्यास श्वसनाच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर नगर व सात रस्ता येथील हवा जास्त प्रदूषित असल्याचे दिसून आले.
वाढत्या प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. शासन याबाबत उपाययोजनांवर भर देत आहे. न्यायालयाने देखील फटाके फोडण्यासाठी वेळेचे निर्बंध लादले होते. मात्र दिवाळीच्या दोन तीन दिवसात प्रदूषणाचा मीटर 200 च्या पुढे गेला. दिवाळीच्या अतिशबाजीनंतर आणि हवेत जमलेल्या सूक्षम धुळीच्या कणातून, त्यात हवेतील दमटता, प्रदूषणकारी कारखाने, वाढणारी वाहतूक यामुळे प्रदूषण वाढले आहे. सीपीसीबीच्या अनुसार गुरुवारी 24 तासाचा हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याची दर्शविले.
रविवारी पहाटेपासूनच फटाके फोडणे सुरू झाले. दिवसभर ते सुरूच होते. सायंकाळी रविवारी व्यापारी पेठांमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण एकदम वाढले. बराच वेळ फुटणाऱ्या फटाक्यांच्या मोठ्या माळा, त्याचप्रमाणे आकाशात जाऊन मोठा बार करणारे, रंग उडवणारे फटाके फार मोठ्या प्रमाणात वाजवले गेले.
प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना असतानाही शहर आणि जिल्ह्यात क्षमतेपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यात आले . त्यामुळे ध्वनी प्रदूषणासोबतच हवेतील प्रदुषणात देखील वाढ झाली.