सोलापूर : उजनी धरणातूनसोलापूर शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी येत्या १५ दिवसात ११० किलोमीटर जागेचे सिमांकन करण्याची कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेसाठी शासन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल. उजनी जलाशय जवळ पंप हाऊस व जॅकवेल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने ०़२५ हेक्टर जागा त्वरित महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी़ जमिनीचे सीमांकन पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करताना अनेक ठिकाणी ही भूमिगत पाइपलाइन शेतकºयांच्या शेतातून जाणार आहे़ त्यामुळे शेतकºयांना विश्वासात घेऊन या पाईपलाईनचे काम करावे व शेतकºयांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजना दोन टप्प्यात राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सोलापूर शहरासाठी उजनी ते सोलापूर समांतर ११० दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, तर दुसºया टप्प्यात सोलापूर शहरासाठी वितरण व्यवस्था सुधारण्यात येणार आहे. सुमारे ४६४ कोटी रुपयांची ही योजना असून योजनेतून प्रतिदिन ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे़ या योजनेमुळे सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे - पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.