सोलापूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी विजापूर वेस ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत "गाडी ढकलो" आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. महागाईचा उडाला भडका, केंद्र सरकारला द्या तडका, उठा उठा महागाई आली, मोदी सरकार जाण्याची वेळ आली, बेचारी जनता करे पुकार, लूट राही है मोदी सरकार, आम आदमी और किसान, झेल रहा पेट्रोल-डिझेल कि मार, वाह रे मोदी तेरा खेल , सस्ती दारू महेंगा पेट्रोल आदी गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सोमवारी सकाळी ११ वाजता विजापूर वेस येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली संख्येने कार्यकर्ते जमले. तेथून सर्व कार्यकर्ते आपली दुचाकी वाहने ढकलत आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत बेगम पेठ पोलीस चौकीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. तेथे आल्यानंतर मोदी सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल बनले आहे. दिवसागणिकच इंधनाच्या दरात वाढ होत आहे. यामध्ये सामान्य जनता होरपळून निघत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत.त्यातच आता इंधन दरवाढीचा दुहेरी सामना नागरिकांना करावा लागत आहे. इंधनाची सतत होणारी वाढ सामान्य जनतेची झोप उडविणारी ठरत आहे. वाढत्या महागाईचा भार मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेवर पडत आहे.मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उत्पन्न कमी आहे. बँकांमध्ये कर्जाचा बोजा वाढलेला असल्याने व नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असतानाच आता इंधन दरवाढीचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर "गाडी ढकलो"आंदोलन करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी रमीज कारभारी, विक्रांत खुणे,प्रवीण साबळे, चेतन गायकवाड, सपन्न दिवाकर,सरफराज बागवान, झहीर गोलंदाज, विवेक फुटाणे, विशाल कल्याणी, आशिष बसवंती,मुबिन शेख, तुषार जक्का, प्रवीण फाळके,जावेद कोटकोंडी, कुणाल वाघमारे,आरिफ बागवान,रमीज मुल्ला, कामले, मोहसीन मुजावर, फरदिन शेख, अदनान शेख, शोएब बागवान आदी उपस्थित होते.