- शीतलकुमार कांबळेसोलापूर : शहरातील महाविद्यालये सुरु झाली आहेत मात्र, जवाहरलाल नेहरू हॉस्टेल सुरु नसल्यामुळे ग्रामीण भागातून सोलापूर शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर राहायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकर हॉस्टेल सुरु करण्याची मागणी जवाहरलाल नेहरू वसतिगृह आजी माजी संघटनेकडून करण्यात आली आहे.
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी नेहरू वसतिगृहाला भेट देऊन वसतिगृहाची पाहणी केली. या दरम्यान त्यांना इमारत जुनी झाल्याचे दिसून आले. तसेच वसतिगृह परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, डागडुजी करण्याची आवश्यकता दिसून आली. त्यामुळे सीईओ आव्हाळे यांनी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
स्वच्छतेचा प्रश्न सुटणारयंदाच्या वर्षीही अशीच परिस्थिती असल्याने अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडले नव्हते. प्रशासनानेही विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी दिली होती. मात्र, यामुळे वसतिगृहाची स्वच्छता व दुरुस्ती करता आली नव्हती. आता स्वच्छतेचे नव्याने टेंडर देण्यात येणार असून, गरजेच्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येणार आहे.
जवाहरलाल नेहरू वसतीगृहात सध्या मुले राहत आहेत. काही मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. 100 टक्के मुले बाहेर गेल्याशिवाय दुरुस्त तरी कशी करायचे ? स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर दुरुस्तीबाबतचा निर्णय घेणार आहोत.- संजय जावीर, शिक्षणाधिकारी