- नारायण गावस पणजी - देशात कॉँग्रेस सरकार आले तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार. यातून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या साेडविल्या जाणार आहे, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी आणी किसान सेलचे अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी पणजीतील कॉँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत गोवा प्रदेश कॉँग्रेसचे विरेंद्र शिरोडकर व इतर सदस्य उपस्थित होते.
शैलेश अग्रवाल म्हणाले, भाजपने शेतकऱ्यांची गेली १० वर्षे फसवणूक केली म्हणून देशभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आता कॉँग्रेस सरकार सत्तेवर आल्यावर किसान न्याय गॅरंटी मार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या जाणार. ऋणमुक्त आयोग लागू करुन शेतकऱ्यांचा सर्व कर्ज माफ केला जाणार आहे. शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत पिकावरील विमा दिला जाणार आहे. याेग्य प्रकारे आयात निर्यात पॉलिसी लागू करणार. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव दिला जाणार आहे. तसेच कृषी वापरावरील साहित्याची जीएसटी रद्द केली जाणार आहे.
शैलेश अग्रवाल म्हणाले, भाजपच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विमा सुरु केला पण त्या विम्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना झाला नाही तर या विम्याचा लाभ जास्त विमा कंपन्यांना तसेच उद्योजकांना झाला आहे. या भाजपला सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही. भाजपने शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात हमीभावही दिलेला नाही. कृषी साहित्यावर जीएसटी वाढवून शेतकऱ्यांना त्रास िदिला. खत, बी, बियाणी यांच्या किमती वाढविल्या म्हणून आज देशभर शेतकरी भाजपच्या विरोधात आहे.