- बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : पावसात खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील पिकं खराब झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पीक सर्व्हे झाला. सर्व्हेत खाडाखोड झाल्याचे सांगत २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी प्रतिनिधींची बैठक घेतली असून त्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कंपनी प्रतिनिधींना रागावले. त्यांना खडेबोल सुनावत विमा रक्कम नाही दिल्यास कंपनी विरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची तंबी दिली. त्यानंतर कंपनीवाले काहीसे नमले. २५ टक्के विमा रक्कम देण्यास तयारी दर्शवली.
पावसात खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले. कोरडा दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्ह्यात पीक सर्व्हे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्व्हे झाला. सर्व्हे अहवाल आल्यानंतर विमा कंपनीस तत्काळ २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देण्याचे आदेश दिले. परंतू, विमा कंपनीने पुन्हा सर्व्हे केला. यात त्यांना खाडाखोड झाल्याचे आढळले. त्याचा रिपोर्ट त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केला. सर्व्हे करताना विमा कंपनी प्रतिनिधी होतेच ना..मग त्यात खाडाखोड कशी झाली, असा उलट प्रश्न आशीर्वाद यांनी केला. त्यामुळे कंपनीवाले काहीसे निरुत्तर झाले.