- दीपक दुपारगुडे सोलापूर - वय वर्षे ४३ असलेला प्रौढ शनिवारी शहरातील शाब्दी नगर येथील कोरड्या नाल्यात बेशुद्धावस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली. त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रौढाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. नीलकंठ शिवण्णा व्हनचेंजे (वय- ४३, रा. रामलाल नगर, होटगी रोड, सोलापूर) असे या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे.
शनिवारी साडेदहाच्या पूर्वी शाब्दीनगर येथील कोरड्या नाल्यात ४३ वयागटातील प्रौढा निपचित पडल्याची माहिती हा हा म्हणता वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांची गर्दी झाली. उपस्थितांपैकी पोलिसांना खबर दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार कटके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोपस्कार पूर्ण करुन तातडीने येथील शासकीय रुग्णालयात नेले. तोपर्यंत संबंधीत नातलगापर्यंत ही बाब पोहचली. तेही दाखल झाले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे निदान त्यांनी केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
संबंधीत व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला. घातपाताचा प्रकार आहे का? याचा एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.