- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - गुन्हा दाखल न करता पिकअप गाडी सोडण्यासाठी पाच लाख रूपये लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हफ्ता ३ लाख रूपये स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मनोहर मोरे (वय ५७) याच्याविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मोरे हे विजापूर नाका पेालिस ठाण्यात कार्यरत असून तक्रारदाराची पिकअप ही गाडी विजापूर नाका पोलिस ठाण्यात जमा होती. यात तक्रारदार यांना सहकार्य करून त्याच्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी व गाडी सोडण्यासाठी मोरे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनगुडे-पाटील याच्यासाठी पाच लाख रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला व चालक राहुल गायकवाड यांनी केली.