सोलापूर : सोलापूरकरांनो, तुम्हाला चालू कर (टॅक्स) बिलामध्ये खासगी नळाची कर आकारणी केली आहे का? मग, तुम्ही काळजी करू नका, महापालिकेने खासगी नळ आकारणी केलेल्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जर तुम्हाला चालू कराच्या बिलात खासगी नळाचे पैसे आकारले असतील तर तक्रार करा, तक्रारीनंतर बिल दुरुस्त होईल; मात्र, त्या बिलाचा पुढच्या वर्षीच्या टॅक्स पावतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. नागरिकांनी ६ टक्के सवलतीचा फायदा व इतर दंड लागू नये यासाठी १५ ऑगस्टच्या आत संपूर्ण बिलाचे पैसे भरावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
दरम्यान, अपार्टमेंटमधील खासगी नळाची आकारणी रद्द होणार आहे. गाळेधारक, बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या खासगी नळाची आकारणी रद्द होणार. एमआयडीसी, अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील खासगी नळाची आकारणी रद्द होणार, हद्दवाढ भागात जेथे पाइपलाइन गेली नाही तेथील खासगी नळाची आकारणी रद्द होणार, खुल्या जागेवर जर पाणीपट्टी लावली असेल तर खासगी नळाची आकारणी रद्द होणार, नळ एक व मिळकती दोन आल्या असतील तर त्यावरील खासगी नळाची आकारणी रद्द होणार असे महापालिकेने कळविले आहे.
सोलापूरकरांनो जर चुकीच्या पद्धतीने जर टॅक्स पावती आली असेल तर संबंधित झोन विभाग, पेठेतील कर निरीक्षक ती पावती दुरुस्त करणार आहेत. तत्पूर्वी कर निरीक्षक संबंधित मिळकतकरांची तक्रारीनंतर सत्य परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
शहरातील मिळकतकरांना टॅक्स बिलाचे वाटप सुरू आहे. खासगी नळाची आकारणी केलेल्या बिलासंदर्भात महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर सहा प्रकारांत बिल लागले असेल तर ते खासगी पाणीपट्टीचे बिल रद्द होणार आहे. पण, मिळकतकरांनी १५ ऑगस्टच्या आत बिलाची संपूर्ण रक्कम भरावी, दुरुस्त केलेल्या बिलाचा परतावा पुढील वर्षाच्या मिळकतकरात वजा करण्यात येईल.- शीतल तेली-उगले, आयुक्त, सोलापूर महानगरपालिका