- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून नदी, नाले ओसांडून वाहत आहेत. अनेक शहरांचे जीवन विस्कळीत झाले असून काही शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, उजनी धरण क्षेत्रात अद्याप म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत मागील आठ दिवसात कोणतीच वाढ झाल्याचे पहावयास मिळत नाही. सध्या उजनीच्या पाण्याची पातळी वजा ३४ टक्के इतकी आहे.
पुणे जिल्ह्यात अन् उजनी धरण परिसरात पाऊस पडला तरच उजनीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. उजनीची पाणीपातळी वाढल्यास सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. मात्र धरणात मागील काही दिवसांपासून पाण्याची पातळी वाढत नसल्याचे दिसून येत असताना शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोलापुरात आज गुरूवार सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. काल सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात २२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या १२ हजार क्सुसेक वेगानं दौण्डमधून विसर्ग येत असल्याचेही सांगण्यात आले.