सोलापूर : वैयक्तिक सभासद वगळता इतर सर्वच संवर्गातील ४ हजार १९७ संस्थाचे मतदार प्रतिनिधी म्हणून ठराव घेण्याचे काम मंगळवार, दि. १७ ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. हे ठराव त्या-त्या तालुक्याच्या निबंधकाकडे जमा केले जात आहेत.
तीन वर्षे प्रशासक कालावधी गेल्यानंतर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा बँकेचे विविध सहकारी संस्था सभासद ४,१९७ व वैयक्तिक सभासद ३२४ असे ४ हजार ५२१ सभासद आहेत. यामध्ये वैयक्तिक सभासदांचे ठराव घ्यावे लागत नाहीत त्यांना थेट मतदानाचा अधिकार आहे. इतर संस्थांचे मात्र मतदान यादीत नाव समावेश होण्यासाठी रितसर ठराव घेण्यात येत आहेत. १६ सप्टेंबरपर्यंत हे ठराव संस्थांनी तालुका निबंधकाकडे सादर करावयाचे आहेत.
सर्वच प्रकारच्या ३१ जुलै २०१८ पर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासद असलेल्या ४ हजार १९७ संस्थापैकी ठराव येतील ते व ३१ जुलै २०१९ पर्यंतचे वैयक्तिक सभासद असलेले मतदार यादीसाठी पात्र ठरणार आहेत.
- - ''अ'' मधील विकास सोसायटी मतदारसंघातून ११ संचालक निवडीसाठी ११९० विकास सोसायट्यांचे प्रतिनिधी.
- - ''ब''मधील जनरल मतदारसंघातील पाच संचालक ( महिला-२, अनुसूचित जाती-जमाती-१, इतर मागास-१ व विशेष मागास प्रवर्ग-१) निवडीसाठी सर्वच ४ हजार ५२१ मतदार.
- - ''क''मधील एक संचालक निवडीसाठी (खरेदी-विक्री संघ, साखर कारखाने, सूतगिरणी, शेतीमाल प्रक्रिया उद्योग संस्था आदी) १२७ मतदार.
- - ''ड''मधील एक संचालक निवडीसाठी (दूध संस्था-१२६५ व वैयक्तिक-३२४) एकूण १५८९.
- - ''इ''मधील एक संचालक निवडीसाठी ( बाजार समिती-११, अर्बन बॅका, पगारदार नोकर पतसंस्था, बिगर शेती पतसंस्था, ग्रामीण पतसंस्था, कंज्युमर सोसायट्या, औद्योगिक संस्था-१५३४) एकूण १५४५.
तीन वर्षांनंतर बँकेत वर्दळ
३० मे २०१८ रोजी बॅंकेवर प्रशासक आल्यानंतर बँकेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वर्दळ कमी झाली होती. मात्र संस्थांचे ठराव घेण्यास मंगळवारपासून सुरुवात झाल्यामुळे दिवसभर बँकेत कार्यकर्त्यांनी चौकशीसाठी गर्दी केली होती.