सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला मागील आर्थिक वर्षात ८६४ कोटी ७१ लाख रुपये एन.पी.ए. (अनुत्पादित कर्ज) झाला असून, त्यामध्ये २१२ पैकी ३५ शाखांची रक्कम ७४० कोटी ९० लाख इतकी आहे. या ३५ शाखांना विशेष अधिकारी व त्यांना विशेष अधिकार देऊन वसुलीवर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हा बँकेची शेती व बिगरशेतीच्या कर्जाची थकबाकी १७०० कोटींवर गेली आहे. शेतीसाठीच्या थकबाकीचा एन.पी.ए. बिगर शेतीपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१३ शाखांची एन.पी.ए. ची रक्कम ८६४ कोटी ७१ लाख ४ हजार इतकी आहे. यापैकी ३५ शाखांच्या एन.पी.ए.ची रक्कम ७४० कोटी ९० लाख इतकी आहे. एकूण एन.पी. ए. च्या रकमेपैकी केवळ ३५ शाखांचा एन.पी.ए, ८५ टक्के इतका आहे.
शेती कर्जाची थकबाकी वाढत असल्याने बँकेपुढील अडचणीत वाढच होत असल्याचे सांगण्यात आले. एनपीएत आघाडीवर असलेल्या ३५ शाखांच्या वसुलीसाठी विशेष अधिकारी नेमण्यात येणार असून त्यांना विशेष अधिकार देण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे.
बार्शी तालुका एन.पी.ए.त आघाडीवर- एनपीएत बार्शी तालुका आघाडीवर असून एकट्या बार्शी तालुक्याचा एनपीए २०५ कोटी ४५ लाख रुपये आहे,माळशिरसच्या एनपीएची रक्कम १८६ कोटी ५३ लाख, अक्कलकोटचा एनपीए ११२ कोटी ५० लाख, करमाळ्याचा ८१ कोटी ४३ लाख, माढ्याचा ६५ कोटी ५२ लाख, मंगळवेढ्याचा ५३ कोटी ७४ लाख, दक्षिण सोलापूरचा ४१ कोटी ७३ लाख, सांगोल्याचा ४० कोटी ५९ लाख, पंढरपूरचा ३७ कोटी ५४ लाख, उत्तर सोलापूर तालुक्याचा २७ कोटी ६३ लाख तर मोहोळची एनपीएची रक्कम १२ कोटी चार लाख इतकी आहे.
या आहेत त्या ३५ शाखा...- सिद्धेश्वर साखर कारखाना, संजीवनी शाखा सोलापूर, निंबर्गी, कंदलगाव, मंद्रुप, सुस्ते, पंढरपूर शहर, आलेगाव, महुद, खुडूस, अकलूज, यशवंतनगर, सदुभाऊ चौक, सदाशिवनगर, वैराग, बार्शी मार्केट यार्ड, जवळगाव, कोरफळे, साडे, करमाळा, केम, केत्तूर, कोर्टी, कोन्हेरी, अनगर, माढा, पिंपळनेर, टेंभुर्णी, चपळगाव, मैंदर्गी, अक्कलकोट, मंगळवेढा, बोराळे, सलगर, मार्केट यार्ड मंगळवेढा या शाखांचा एन.पी.ए. अधिक आहे.
शासनाचे कर्जमाफीचे धोरण थकबाकी वाढीचे कारण आहे. कर्ज भरण्याची मानसिकता असलेल्या शेतकºयांनीही कर्ज भरले नाही. कर्जमाफीचा फायदा नियमावलीमुळे अधिक शेतकºयांना झाला नसल्याने थकबाकी वाढली.-राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा बँक