सोलापूर:गटातटाच्या राजकारणात फसलेला काँग्रेसचा गाडा काहीकेल्या हलत नाही, गटबाजीने पराभवाची चव चाखलेल्या जिल्ह्याच्या काँग्रेसमध्ये अॅड़ रामहरी रुपनवर यांच्या रुपाने तिसरी शक्ती उदयाला आली आहे़ लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षातील गटातटाचे राजकारण उफाळून आले होते़ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मानणारा मोठा गट सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसून येतो़ एकत्रित काँग्रेस असताना जिल्ह्यात मोहिते-पाटील आणि शिंदे असे दोन गट होते़ काँग्रेसच्या विभाजनानंतर मोहिते-पाटील समर्थक राष्ट्रवादीत गेले़ तर सुशीलकुमार शिंदे समर्थकांनी काँग्रेसबरोबर राहण्याचा निर्णय घेतला़ मध्यंतरीच्या काळात प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ तेव्हा ग्रामीण भागातून त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जनसेवा संघटनेच्या रुपाने वेगळे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला़ सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय उत्कर्षानंतर काँग्रेसमधील गटबाजी काहीशी कमी झाली आणि शिंदे हेच जिल्ह्यातील काँग्रेसजनांचे एकमेव नेते राहिले़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अंतर्गत गटबाजी उफाळून आली़ दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून राजकीय मतभेद झाले़ प्रचारात एका व्यासपीठावर वावरणाऱ्या नेत्यांची मने मात्र दुभंगलेली होती़ याचा प्रत्यय कार्यकर्त्यांसह खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनाही आला़ स्वकियांनी निवडणुकीत घात केला़, असे विश्लेषण निवडणूक निकालानंतर शिंदे यांनी केले़ याचाच अर्थ शिंदे समर्थक आणि विरोधक असे दोन गट काँग्रेसमध्ये कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ अॅड़ रामहरी रुपनवर यांची काँग्रेसने नुकतीच विधानपरिषदेवर नियुक्ती केली आहे़ रुपनवर हे भाजपातून काँग्रेसमध्ये आले़ जिल्हा काँग्रेसमध्ये त्यांचा वावर झाला तरी कार्यकर्त्यांशी ते समरस झाले नाहीत़ प्रदेश सरचिटणीस पदावर काम करताना जिल्ह्याशी त्यांचा संपर्क तुटला़ पक्षाचे केंद्रीय प्रभारी मोहन प्रकाश यांच्या मदतीने त्यांनी विधानपरिषद गाठली़ अर्थात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचाही त्यांनी विश्वास संपादन केल्यानेच ही नियुक्ती होऊ शकली़ रुपनवर यांच्या नियुक्तीने काँग्रेस अंतर्गत छुप्या नाराजांच्या आशा पल्लवित झाल्या़ शिंदे समर्थकांच्या नाकावर टिच्चून त्यांनी विधानपरिषदेत प्रवेश केला़ त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात रुपनवर यांच्या निवडीचे फारसे पडसाद उमटले नाहीत़ याउलट काँग्रेस कमिटीत त्यांच्या निवडीनंतर सन्नाटाच पसरला़ अशाही स्थितीत विजय शाबादे आणि कार्यकर्त्यांनी शिंदे समर्थकांशी हुज्जत घालून रुपनवर यांच्या निवडीचा ठराव मांडलाच़ गटतट बाजूला ठेवून एकत्र काम करा, अशी सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसजनांना हात जोडून नम्रतेची विनंती केली होती़ त्यांच्या विनंतीला आठवडा लोटला नाही, तोच खुद्द श्रेष्ठींनी रुपनवर यांची वर्णी लावून एका अर्थाने पक्षातील गटबाजीला खतपाणीच घातले आहे़ रुपनवर यांनीही आपल्या नियुक्तीचे श्रेय पक्षश्रेष्ठींना देताना सुशीलकुमार शिंदे यांचा नामोल्लेख जाणीवपूर्वक टाळला़ यावरुन रुपनवर यांच्या जिल्ह्यातील राजकारणाची दिशा काय राहणार हेही स्पष्ट झाले़ -----------------------------------------नाराजांचा स्वतंत्र गट...विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या विष्णुपंत कोठे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, कल्याणराव काळे, महेश कोठे यांचा अॅड़ रुपनवर यांच्या नियुक्तीने पुरता भ्रमनिरास झाला आहे़ निवडणुकीत पायाला भिंगरी बांधून पक्षासाठी रात्रीचा दिवस करणारे नेते गेले काही दिवस नैराश्येचा सूर आळवत आहेत़ ‘काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची कदरच नाही’ अशी निराशाजनक प्रतिक्रिया व्यक्त करीत पक्षापासून यापुढच्या काळात अलिप्त राहण्याचे संकेत ही मंडळी देत आहेत़ अंतर्गत विरोध असला तरी नाराजांचा स्वतंत्र गट काँग्रेसमध्ये स्वत:चं अस्तित्व ठेवणार असल्याची चर्चा ऐकायला मिळते़
सोलापूर जिल्हा काँग्रेसमध्ये तिसऱ्या शक्तीचा उदय...!
By admin | Published: June 11, 2014 12:38 AM