सोलापूर : जिल्हा परिषदेत एक महिन्यांपासून रंगलेल्या पक्षनेता निवडीच्या वादामुळे अंदाजपत्रकीय सभेचा मुहूर्त टाळला जात आहे. जिल्हा परिषदेचे उत्पन्न कमी होत असल्याबाबत ओरड सुरू असतानाही याबाबत बैठक घेण्यासाठी कोणीच उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे.
अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी फेब्रुवारीअखेर अंदाजपत्रकीय सभा घेण्याचा मनोदय जाहीर केला होता. पण १३ फेब्रुवारीच्या सभेत पक्षनेते व विरोधी पक्षनेतेपदाची निवड घोषित न करणे त्यांच्या अंगलट आल्याची आता चर्चा रंगली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी पक्षनेतेपदासाठी अण्णाराव बाराचारे यांची शिफारस केली होती. पण सभेत निवड न झाल्याने बाराचारे यांनी प्रशासनाकडे धाव घेतली. प्रशासनाने त्यांना कार्यालयाचा ताबा घेण्याचे पत्र दिले. हा वाद वाढल्यानंतर अध्यक्ष कांबळे यांनी तानवडे यांना पक्षनेतेपदावर कायम केल्याचे पत्र दिले. तरीही हा वाद मिटलाच नाही. भाजपकडून बाराचारे यांचेच नाव रेटले गेल्याने प्रकरण चिघळल्याचे दिसून येत आहे.
सध्या पक्षनेते म्हणून तानवडे जिल्हा परिषदेच्या बैठका व कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत, तर भाजपमध्ये अजून निवडीबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे. या वादामुळे अंदाजपत्रकाचा मुहूर्त लांबला आहे. प्रशासनाने अंदाजपत्रक तयार केले असून, सभेपुढे सादर करण्याची तयारी झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी म्हटले आहे.
अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी आता २० मार्च रोजी अंदाजपत्रकीय सभा घेण्याचे नियोजन जाहीर केले आहे. पण उत्पन्नवाढीच्या बैठकीबाबत कोणतेच नियोजन झाल्याचे दिसून येत नाही. यापूर्वी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी बोलावलेली बैठक रद्द झाली आहे. जिल्हा परिषदेच्या जागा किती व त्यांचा विकास करून निधी वाढविता येतो काय, याबाबत लक्ष वेधले जात आहे. यंदा जिल्हा परिषदेचे उत्पन्न १० कोटींनी घटणार, असा अंदाज सचिन देशमुख यांनी वर्तविला आहे. त्यामुळे सेस फंडातून घेण्यात येणाºया विकासकामांवर परिणाम होणार आहे. सर्व सदस्यांना समान निधी देण्याबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी नितीन नकाते यांनी केली आहे. राळेरासजवळ अपघातात मरण पावलेल्या कंत्राटी कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, याबाबत रेखा राऊत, मदन दराडे व अन्य सदस्य आग्रही दिसत आहेत. तर इकडे विविध योजनांचा निधी ५० ते ६० टक्केच खर्ची झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मार्चअखेर उर्वरित निधी खर्ची घालण्याचे नियोजन काय, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे.
खर्चाबाबत आढावा नाहीचअध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी खर्चाचा आढावा घेण्याबाबत बैठक घेणे अपेक्षित होते. नित्याच्या समित्यांच्या सभा वगळता प्रशासनातील विभागप्रमुख व पदाधिकाºयांची एकत्रित एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचा निधी खर्ची किती पडला व आणखी किती शिल्लक आहे, याची माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर विविध योजनांच्या खर्चाबाबत आढावा झालेला नाही. समाजकल्याण व इतर विभागांचा निधी किती शिल्लक आहे, हा निधी शासनाकडे परत जाऊ नये, यासाठी खातेनिहाय आढावा घेऊन नियोजन होणे गरजेचे असल्याचे मत उमेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.