सोलापूर: न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कारणावरून आरोपींनी सत्र न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावून न्यायालयाचा अवमान केला. शुक्रवारी सकाळी ११.५५ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
राहुल भीमराव राठोड (वय २४), भीमराव देवराज राठोड (वय ४५), राजू महादेव चव्हाण (वय २२), रोशन भीमराव राठोङ (वय २२, सर्व रा. शिवाजीनगर तांडा, अक्कलकोट, जि. सोलापूर, सध्या न्यायालयीन बंदी) अशी आरोपींची नावे आहेत.
यातील फिर्यादी नीलेश नागेश खमितकर यांनी जेलरोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणातील चारही आरोपींविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खून आणि खुनाचा प्रयत्न या आरोपावरुन (भा. दं. वि. ३०२, ३०७, ३९५) अन्वये खटला सुरू आहे. खटल्यातील आरोपींनी गुरुवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता खटला सुरू असताना सुनावणी करायची नाही, असे न्यायाधीशांना सांगितले होते; मात्र न्यायाधीशांनी तसे करता येणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर आरोपींनी निशाणी क्रमांक १०७ प्रमाणे अर्ज देऊन खटल्याची सुनावणी थांबवण्यास सांगितले होते. न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर आरोपींनी त्यांचे वकील जी. टी. पवार यांना साक्षीदार क्रमांक ६ सोमनाथ देवकते यांचा फेर उलटतपास घेऊ नका असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी फेर उलटतपास घेतला नव्हता.
दुसºया दिवशी शुक्रवारी (१५ फेब्रुवारी २०१९) सकाळी १०.३० वाजता न्यायालयाचे दैनंदिन कामकाज सुरु झाले. एका विशेष खटल्याची सुनावणीानंतर ११.५५ च्या दरम्यान गुरुवारी सुनावणी झालेल्या खटल्यातील आरोपींना पुकारण्यात आले. ते न्यायालयात प्रवेश करू लागले त्यावेळी आरोपी राहुल राठोड याने न्यायाधीशांच्या आसनाकडे धावत जाऊन पायातील चप्पल काढून न्यायाधीशांच्या दिशेने फेकून मारल्याने ती त्यांच्या डाव्या खांद्याला लागली. पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले.
दुसरा आरोपी भीमराव यानेही त्याच्या पायातील चप्पल काढून न्यायाधीशांच्या दिशेने फेकून मारली. याच दरम्यान अन्य दोन आरोपी राजू चव्हाण आणि रोशन राठोड यांनी न्यायाधीशांच्या दिशेने धाऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी रोखून न्यायालयाच्या बाहेर नेले, असे या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
या खळबळजनक घटनेची खबर मिळताच सहायक पोलीस आयुक्त दीपाली काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम अभंगराव, फौजदार लिगाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास फौजदार लिगाडे करीत आहेत.