सोलापूर : निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये दुबार, समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्र संदर्भातील त्रुटी दूर करणे व मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हवे आहेत. मुख्य सचिवांनी कळविलेल्या परिपत्रकाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांनी जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पदावर काम करण्यासाठी मागणी केल्याप्रमाणे कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी केले आहे.
मतदारांच्या घरोघरी जाऊन दुबार, समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्र संदर्भातील त्रुटी दूर करणे व मतदार यादी अद्ययावत आणि पडताळणी करण्याचे नियोजित आहे. अशा सर्वेक्षणाच्यावेळी आढळून येणाऱ्या बाबीच्या आधारे १०० टक्के मतदारांच्या मतदार यादीतील चुकीची दुरुस्ती करुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची आवश्यकता आहे. या पदावर नियुक्ती करण्यासाठी जिल्हास्तरावरील सर्व क्षेत्रिय कार्यालयांकडून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग उपलब्ध करून घ्यावा लागणार आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मधील २९ मधील तरतुदीस अनुसरून जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुख यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी/ मतदान नोंदणी अधिकारी यांना मागणी केल्याप्रमाणे कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देताना त्यांना त्या कार्यालयातून कार्यमुक्त न करता कार्यालयीन आदेशान्वये त्यांच्या सेवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या पदावर काम करण्यासाठी तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. या कर्मचाऱ्यांनी त्यांचे कार्यालयीन कामकाज सांभाळून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी / मतदान नोंदणी अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, असेही वाघमारे यांनी कळविले आहे.