सोलापूर: जिल्ह्यात गेल्या चार दिवसात वाढलेल्या गारव्याने जनावरांना लाळ-खुरकत साथीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
गतवर्षी माळशिरस व मंगळवेढा तालुक्यात लाळ-खुरकतच्या साथीने जनावरे दगावल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी वेळीच खबरदारी घेण्यात आली. तरीही वाईट हवामानाचा फटका पशुधनाला बसला आहे. मंगळवेढा तालुक्यात लाळ-खुरकत साथीची लागण झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी व विस्तार अधिकाºयांना उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर दैवज्ञ यांनी सांगितले. या रोगाची लागण झालेल्या जनावरांना लक्षणानुसार उपचार करावे लागतात.
बरे होण्यासाठी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागतो. या काळात जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते. गाभण जनावरांच्या अंगावरील केस वाढतात व उष्णता सहन करण्याची क्षमता कमी होते. अशा जनावरांनी पिलेले पाणी फेकून द्यावे. या काळात बाजारातील जनावरे खरेदी करून थेट गोठ्यात आणू नयेत, असे आवाहन दैवज्ञ यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे सप्टेंबर अखेर ११ लाख २८ हजार १२० जनावरांना लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले होते. यामध्ये ७ लाख ३० हजार ४६१ गाई व ४ लाख ४९ हजार ५६५ म्हशी असे ११ लाख ८० हजार २६ अशा दुभत्या जनावरांना हे लसीकरण करण्यात आले होते. पशुधनाचा लाळ-खुरकत या रोगापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शासनाच्या योजनेतून दरवर्षी दोन फेºयात लसीकरणासाठी निधी उपलब्ध केला जातो. सन २०१७-१८ मध्ये एकाच फेरीसाठी ११ लाख ७६ हजार ८५० लसींचा पुरवठा ९ मार्च २०१८ रोजी करण्यात आला. यामधून ही लस देण्यात आली.
काय आहेत लक्षणे... - जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे हवामानात सतत बदल होत आहे. दिवसा उष्ण व रात्री थंड वारे सुटल्यावर याचे विषाणू वेगाने पसरतात. यंदा केरळमध्ये अतिवृष्टी झाली. अशा राज्यातील जनावरे बाजारात आल्यामुळे या रोगाचा प्रसार वाढला.