राजकुमार सारोळे सोलापूर : जिल्ह्यात एक रुपयाही खर्च न करता ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून १७00 बंधारे बांधून पूर्ण करण्यात आल्याची माहिती झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे श्रमदानातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाºयाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. झेडपी, राज्य शासनाचा कृषी विभाग, केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि पाथरी येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून बुधवारी या बंधाºयाची उभारणी केली.
या बंधाºयाची पाहणी सीईओ डॉ. भारुड यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, वित्त आणि लेखा अधिकारी महेश अवताडे, शिक्षण अधिकारी संजय राठोड, निवृत्त ग्रुप कॅप्टन प्रतापसिंह परदेशी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी रंजना कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार,पाथरीच्या सरपंच अलका बंडगर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, नंदकुमार पाटील, सुभाष डोंगरे, नीता चलवादे, अविनाश गोडसे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांनी वनराई बंधारे उभारण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी बोलताना निवृत्त कॅप्टन प्रतापसिंह परदेशी यांनी राज्यातील प्रत्येक गावात वनराई बंधारे उभारण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. अनियमित पावसामुळे शेतीचे व्यवस्थापन करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी विकेंद्रीत पद्धतीने जलसाठे होण्याची आवश्यकता असून वनराई बंधारे त्यासाठी उपयुक्त ठरतील असेही ते म्हणाले. त्यावर सीईओ डॉ. भारुड यांनी टंचाई परिस्थितीत वनराई बंधारे उभारण्यासाठी भर दिला जाईल, असे सांगितले.
बंधाºयाचे उद्दिष्ट- झेडपीचा एक पैसा खर्च न करता केवळ टाकाऊ सिमेंटच्या पोत्यापासून हे बंधारे साकारण्यात येत आहेत. जिल्ह्यात प्रत्येक गावाशेजारच्या ओढ्यावर पाच याप्रमाणे ५७00 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. १७00 बंधारे बांधून पूर्ण असून, येत्या काही दिवसात उर्वरित बंधारे पूर्ण करून घेतले जाणार आहेत.