सोलापूर: दुष्काळाचे परिणाम हळूहळू दिसू लागले असून, जिल्ह्यातील दूध संकलनावर परिणाम झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात दूध संकलनात प्रतिदिन २० हजार लिटरने घट झाली आहे. पुढील दोन महिन्यांचा शेतकºयांसाठी कठीण काळ असल्याचे सांगण्यात येते.
जानेवारीपासून जून-जुलैपर्यंतचा कालावधी हा दूध संकलनात घट होण्याचा कालावधी समजला जातो. सोलापूर जिल्ह्यात मागील चार-पाच वर्षांपासून दूध संकलन सरासरी १२ लाख लिटर सातत्याने टिकून आहे; मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याचा परिणाम जनावरांची संख्या घटण्यावर व दूध संकलन कमी होण्यावर झाला आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्यात सोलापूर जिल्ह्याचे एकूण दूध संकलन प्रतिदिन १२ लाख ९१ हजार ८३ लिटर झाल्याची आकडेवारी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाची आहे. यावर्षी मार्च २०१९ या महिन्यात प्रतिदिन १२ लाख ७१ हजार २८० लिटर दूध संकलन झाले असल्याचे सांगण्यात आले. दोन वर्षांतील मार्च महिन्यात संकलन झालेल्यामध्ये प्रतिदिन २० हजार लिटरची घट झाल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.
मागील वर्षी पाऊस कमी झाल्याचा हा परिणाम आहे. जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी यावर्षी ऊस गाळप केले. यावर्षी अन्य चारा नसल्याने साखर कारखाने सुरू होते तोपर्यंत उसाच्या वाड्याचा चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर झाला. कारखाने बंद झाल्यानंतर वाळलेल्या वाड्याचा चारा, शिल्लक असलेले काहीअंशी गवत व कडब्यावर जनावरे जतन केली आहेत. जनावरांची भूक भागण्याइतका चारा मिळत नसल्याने जनावरांच्या दूध संकलनावर परिणाम झाला आहे. याचेच परिणाम आता दिसू लागले आहेत.
आता पाण्याचीही टंचाई
- - सध्या चाºयासोबत पाण्याचीही टंचाई भासू लागली आहे. गावोगावी टँकरद्वारे नागरिकांना पाणी दिले जात असून एका व्यक्तीसाठी प्रतिदिन २० लिटर पाणी मंजूर केले जात आहे. यात जनावरांच्या पाण्याचा कसलाही विचार केला जात नाही. गावोगावी असलेल्या जनावरांना पुरेसे पाणी मिळणे मुश्कील झाले आहे.
- - सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ व शिवामृत सहकारी दूध संघ अकलूज यांचे दूध संकलन मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. जिल्हा संघाचे ६ हजार व शिवामृतचे २२ हजार लिटर दूध वाढले आहे; मात्र खासगी संघाच्या संकलनात जवळपास ३९ हजार लिटरची घट झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आमच्या दूध संकलनात २२ हजार लिटर दूध संकलन वाढले होते. वर्षभर दूध संकलन वाढत गेले मात्र मार्च-एप्रिल महिन्यात १५ हजार लिटर संकलन कमी झाले आहे. मार्च १८ च्या तुलनेत मार्च १९ मध्ये ५-६ हजार लिटर दूध संकलन वाढले आहे.- सतीश मुळेव्यवस्थापकीय संचालक दूध संघ