सोलापूर: सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मतदार यादीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली असून, न्यायमूर्ती जी.एस. पटेल व माधव जामदार यांच्यासमोर शुक्रवार दिनांक २१ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील राजकुमारी महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेने मोहोळ तालुक्यातील ४७ दूध संस्थांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी याचिकेत केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हरकतीद्वारे जिल्ह्यातील ५४ संस्थांची नावे दूध संघाच्या फेरयादीत समावेश झाली आहेत. नव्याने समावेश झालेल्या ५४ दूध संस्थांमध्ये एकट्या मोहोळ तालुक्यातील ४७ संस्था आहेत. जिल्ह्यातील अवसायनात काढलेल्या ९०४ पैकी माढा, मोहोळ, करमाळा व मंगळवेढा या तालुक्यातील जवळपास ३७५ संस्थांना सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने सहकार मंत्री व सहायक निबंधक (दूध) यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. न्यायालयाने स्थगिती देताना कार्यरत संस्थांचा मतदार यादीत समावेश करण्याबाबत विचार करावा, असे म्हटले होते.
प्रारुख मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, आलेल्या हरकतीमधून मतदार यादीत समाविष्ट झालेल्या संस्था या सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिलेल्यामधील आहेत. त्यामुळे त्या ४७ संस्था मतदान यादीतून वगळण्याची मागणी याचिकेत केली आहे. यावर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
- * दूध संघ मतदारांची २६३ दूध संस्थांची प्रारुख मतदार यादी जाहीर
- * १०१ दूध संस्थांच्या मतदार यादीत समावेश करण्यासाठी हरकती
- * त्यामधील ५४ संस्थांचा मतदार यादीत नव्याने समावेश
- * ५४ मधील मोहोळ तालुक्यातील ४७ संस्थांची नावे वगळण्यासाठी याचिका
- * मंत्र्यांच्या स्थगितीनंतर लेखापरीक्षण केल्याने वगळण्याचा प्रभावी मुद्दा