सोलापूर: ‘आयजीच्या जिवावर बायजी’ या म्हणीप्रमाणे शासनाने स्वत:वर एक रुपयाही बोजा पडू न देता दूध खरेदी दर वाढवून सहकारी संघाला अडचणीत आणल्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने राखीव निधीतून एक कोटी २० लाख रुपये काढण्याचा प्रस्ताव जिल्हा बँकेकडे दिला आहे.
राज्यातील शेतकºयांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. हे वाढीव दर देण्यास सहकारी संघाला बंधनकारक आहे. गाईच्या दुधाची खरेदी २४ रुपयांवरुन २७ रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दूध खरेदीतही तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती. एकीकडे खासगी संघ प्रति लिटर २० रुपयांचा दर देत असताना दूध पंढरीला मात्र प्रति लिटर २७ रुपये देण्याचे बंधनकारक आहे.
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दर नाही दिला तर सहकार कायद्यानुसार संचालक मंडळावर कारवाई होऊ शकते. या निर्णयाप्रमाणे काही दिवस तरी गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रुपयांचा दर संघाला द्यावा लागला होता. आजही गुणवत्तेच्या दुधाला २७ रुपयांचा दर देत असल्याचे दूध संघाकडून सांगितले जाते. यामुळे सोलापूर जिल्हा दूध संघ मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. दूध संघाच्या नफ्यातून काही टक्के रक्कम राखीव निधी म्हणून जिल्हा बँकेत ठेवली आहे. ही रक्कम ६ कोटी एक लाख इतकी असल्याचे सांगण्यात आले. यापैकी एक कोटी २० लाख रुपये काढण्याचा प्रस्ताव असून, तशी रितसर मागणी संघाने जिल्हा बँकेकडे केली आहे.
तर ही वेळ आली नसती: राजन पाटील च्शेतकºयांना चार पैसे मिळावेत यासाठी दूध खरेदी दर वाढविण्याचा चांगला निर्णय शासनाने जाहीर केला परंतु तो भार संघाला सोसावा लागतोय. फुकट पुढारपण करण्यासाठी सहकारी संघावर दूध दरवाढीचा बोजा पडल्याने आज संघ अडचणीत आला आहे. शासनाने सहकारी संघाला दूध घालणाºया शेतकºयांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केले असते तर संघाला तोटा झाला नसता.
रितसर मिळाली परवानगीराखीव निधीतून एक कोटी ४९ लाख रुपये काढण्याची परवानगी विभागीय उपनिबंधक(दूध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे मागितली होती. त्यांनी एक कोटी २० लाख रुपये काढण्यास परवानगी दिली असल्याचे दूध संघाकडून सांगण्यात आले. राखीव निधीतून काढलेली रक्कम पुन्हा त्याच खात्यावर भरावी लागणार आहे.
मागील तीन वर्षापासून काटकसरीने कारभार केल्याने संघावर असलेले ४० कोटींचे कर्ज १५ कोटींनी कमी झाले आहे. दही प्रकल्प विस्तारीकरणासाठी राखीव निधीतून काढलेला पैसा वापरला जाणार असून पुन्हा १० हप्त्यात परत भरणा केला जाणार आहे.- सतीश मुळे, व्यवस्थापकीय संचालक, दूध पंढरी