सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सन २०२३ अखेर राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बाजी मारली आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात पहिले सोलापूर जिल्ह्याला ४३.१२ गुण आहेत. दुसरा सांगली जिल्हा ४२.४६, तसेच तिसरा सिंधुदुर्ग जिल्हा ४१.६, इतके गुण प्राप्त करुन पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांचे राज्य स्तरातून कौतुक व होत आहे. राज्यात आरोग्य विभागांतर्गत जवळपास ३५ उपक्रमांचे सर्व जिल्ह्यांचे मुल्यांकन केले जाते. यामध्ये माता आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण, क्षयरोग दुरीकरण, कृष्ठरोग शोध मोहिम, असंसर्गीय आजार प्रतिबंधात्मक, आयुष्यमान भारत, गुणवत्ता आश्वासन, कुटूंब कल्याण, आर्थिक खर्चाचा आढावा नियोजन, मनुष्यबळ माहिती अद्ययावत करणे, टेली कन्सल्टेशन, राष्ट्रीय नागरी अभियान अंतर्गत वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, साथरोग नियंत्रण कार्यक्रम आदी उपक्रमांचा समावेश आहे.
यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त धिरजकुमार यांनी लेखी पत्रान्वये सोलापूर जिल्हा प्रथम असल्याचे कळविण्यात आले आहे.