सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जून २०१९ पर्यंतचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असून, उपाययोजनेसाठी शासनाकडे ३७ कोटी ९ लाखांची मागणी केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी दिली.
यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौºयावर आल्यावर त्यांनी टंचाई स्थितीचे आराखडे तयार करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यात कोणकोणत्या गावात पाणीटंचाई जाणवेल याचे सर्वेक्षण करून टंचाई निवारणार्थ उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ४०७ गावे व ५४५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवणार आहे. या काळाच्या उपाययोजनेसाठी १० कोटींची गरज भासणार आहे.
जानेवारी ते मार्च २०१९ या काळात ५५० गावे व १००६ वाड्यांवर पाणीटंचाई जाणवणार आहे. या काळातील पाणीटंचाईचे नियोजन करण्यासाठी १२ कोटी ३७ लाख रुपये लागणार आहेत, तर एप्रिल ते जून २०१९ या काळात ६४० गावे व ११८३ वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार हे गृहीत धरून या काळासाठी १४ कोटी ७१ लाख खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे जून २०१९ पर्यंतच्या पाणीपुरवठा टंचाईचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे अनेक गावे व वाड्यावस्त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणावर नियोजन करावे लागणार आहे.
दुष्काळाची दाहकता वाढली तरी आपत्कालीन स्थितीत तोंड देण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात कोठेही टँकर सुरू नसला तरी अनेक गावांनी मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई असलेल्या गावांना टँकरचे नियोजन करण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे पाण्याची टंचाई असल्याच्या तक्रारी आल्यावर स्थानिक आमदार फंडातून चार विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.
असा आहे पाणीटंचाई आराखडा- आॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ या काळातील पाणीटंचाई नियोजनासाठी ३७ कोटी ९ लाख खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या काळात ६५८ गावे व ११९३ वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई जाणवेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. यामध्ये अक्कलकोट, गावे: ११७, वाड्या: १९, बार्शी: ५६, करमाळा: ८९, माढा: ६६, वाड्या: १, मंगळवेढा: ७३, वाड्या: ५४८, माळशिरस: २२, वाड्या: १६०, मोहोळ: ३८, उत्तर सोलापूर: ३६, वाड्या: ५, पंढरपूर: ३८, वाड्या: १४२, दक्षिण सोलापूर: ७०, वाड्या: २, सांगोला: ५३, वाड्या: ३१६.