राकेश कदमआॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : मोबाईल क्रमांक, शिष्यवृत्ती, अंगणवाडीतील सुविधा, विविध प्रकारच्या शासकीय योजना अशा एक नव्हे शेकडो कामांसाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याचे मेसेज आपल्या मोबाईलवर येत आहेत. तर दुसरीकडे आधार कार्ड काढून देणारी महा-ई-सेवा केंद्रांमधील यंत्रणा कमालीची विस्कळीत झाली आहे. महा-ई-सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापन सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत असले तरी महा-ई-सेवा केंद्र चालकही वैतागून गेले आहेत. आधार कार्ड काढण्याचे काम पूर्वी खासगी यंत्रणेमार्फत केले जात होते. यासाठी खासगी कंत्राटदारांना सरकार ठराविक पैसे देत होते. त्यामुळे कंत्राटदारांनी नागरिकांचे काम मोफत करणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी लूट सुरू केली. त्यामुळे शासनाने हे काम शासकीय यंत्रणेमार्फत सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटरकडे दिलेली आधार किट महाईसेवा केंद्राकडे हस्तांतरित केली. महा-ई-सेवा केंद्र चालकाने आधार कार्ड काढून देणाºया आॅपरेटरची माहिती प्रमाणपत्रासह युआयडीकडे जमा करणे बंधनकारक आहे. या आॅपरेटरची पडताळणी झाल्यानंतर शासनाकडून महा-ई-सेवा केंद्राला पासवर्ड दिला जातो. हा पासवर्ड मिळाल्यानंतर महा-ई-सेवा केंद्रामध्ये आधार कार्ड काढता येते. जवळपास सर्वच महा-ई-सेवा केंद्र चालकांनी ही माहिती भरून पडताळणी करून घेतली आहे. परंतु, त्यांना अद्याप पासवर्ड देण्यात आलेला नाही. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर या तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्राकडून मुख्य कार्यालयाकडे तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र अडचणी दूर होताना दिसून येत नाहीत.---------------------फक्त ९८ ठिकाणी काम सुरू जिल्ह्यात ११६० गावे आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत एकूण १३४ महा-ई-सेवा केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी ९८ केंद्रांमध्ये आधार नोंदणीचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक ठिकाणी काम ठप्पच आहे. प्रशासनाने मंडलनिहाय आधार केंद्रे दिली आहेत. मंडल परिसरातील गावांनी एकाच ठिकाणी येऊन आधार कार्ड काढायचे आहे. दुर्गम भागातील लोकांना यात अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत. तालुका स्तरावरील सेतू केंद्रामध्ये आधारची सुविधा अद्याप कार्यरत आहे़ --------------------तगादा कायम अंगणवाडी बालके, शाळा, महाविद्यालयांमध्ये आधार कार्डसाठी तगादा लावला जात आहे. आधार नोंदणीची यंत्रणाच विस्कळीत असल्यामुळे पालकांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. हेलपाटे घालावे लागत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आधार नोंदणी यंत्रणा विस्कळीत, जिल्हास्तरावरून नियोजन होईना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:15 AM
मोबाईल क्रमांक, शिष्यवृत्ती, अंगणवाडीतील सुविधा, विविध प्रकारच्या शासकीय योजना अशा एक नव्हे शेकडो कामांसाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याचे मेसेज आपल्या मोबाईलवर येत आहेत. तर दुसरीकडे आधार कार्ड काढून देणारी महा-ई-सेवा केंद्रांमधील यंत्रणा कमालीची विस्कळीत झाली आहे
ठळक मुद्देमहा-ई-सेवा केंद्रांमधील यंत्रणा कमालीची विस्कळीत महा-ई-सेवा केंद्र चालकही वैतागून गेलेजिल्हा प्रशासनामार्फत एकूण १३४ महा-ई-सेवा केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध