सोलापूर : सोलापूरचे सुपुत्र युवा शल्यचिकित्सक (गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट अर्थात पोटाचे विकार तज्ज्ञ) डॉ. श्रीकांत दत्तात्रय माकम हे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुजू झाले आहेत.
गेली ४ वर्षे त्यांनी हैदराबाद येथील जगविख्यात एशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोएंटेरोलॉजी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस केली. या हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नागेश्वर रेड्डी हे पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत़अशा जागतिक कीर्तीच्या गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्टसमवेत डॉ़ माकम यांनी प्रॅक्टीस केली, अनेक जटिल शस्त्रक्रियेत सहभाग घेतला़ याचे वैद्यकीय क्षेत्रात कौतुकही होत आहे़ डॉ़ माकम यांना देश-विदेशात मोठ्या संधी असताना त्यांनी सेवेकरिता कर्मभूमीला प्राधान्य दिले आहे़ सोलापुरात क्वॉलिटी केअर सेवा देण्याचा ध्यास त्यांनी घेतला असून ते येथील सिव्हिलमध्ये रुजू झाले आहेत.
त्यांच्या निर्णयाचे वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत आणि कौतुक होत आहे़ विशेष म्हणजे डॉ़ माकम यांच्या आई लक्ष्मीबाई या श्रमिक विडी कामगार असून, त्या सेवानिवृत्त आहेत़ तर त्यांचे वडील दत्तात्रय माकम हे यशवंत सूत मिलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करायचे़ तेही सेवानिवृत्त आहेत़ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ़ माकम यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले़ श्रमिक कुटुंबात त्यांची जडणघडण झाली़ डॉ़ माकम हे अत्यंत हुशार आणि अभ्यासू आहेत़ त्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाल्या़ त्यांची व्याख्यानेही झाली आहेत़ पूर्व भागातील लक्ष्मीनारायण टॉकीजजवळ त्यांचे घर आहे़ अत्यंत साधे राहणीमान असलेल्या डॉ़ माकम यांना देश-विदेशातून खूप संधी आहेत़ अशा मोठ्या संधींना त्यांनी नकार दिला आहे़ शासकीय रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली आहे.
देशात चौथा- डिसेंबर २०१५ मध्ये डॉ़ माकम यांनी तज्ज्ञ डॉक्टरांची केंद्रीय परीक्षा दिली. यात ते अख्ख्या भारतातून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले़ २०१५ साली सोलापुरातील डॉ़ वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम केले़ त्यानंतर ते हैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोएंटेरोलॉजी हॉस्पिटलमध्ये रुजू झाले़ येथे त्यांनी ४ वर्षे प्रॅक्टीस केली़ प्रॅक्टीसदरम्यान बँकॉक येथे झालेल्या दुर्बिणीद्वारे आधुनिक शस्त्रक्रियासंबंधित प्रशिक्षणात त्यांनी सहभाग नोंदवला.