- दीपक दुपारगुडे सोलापूर : टेम्पो आणि दूध वाहून नेणारा टँकर ही दोन वाहने समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला. टेम्पोचालकावर सिव्हिल हाॅस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान कुर्डूवाडी-पंढरपूर रस्त्यावर कुर्डू हद्दीत झाला. या अपघातात वाही सुरेश (वय ४०, रा. आंध्र प्रदेश) हा टँकर चालक मरण पावला तर टेम्पो चालक रोहितकुमार पटेल (वय २५, रा. उत्तर प्रदेश) हा देखील किरकोळ जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दूध वाहतूक करणारा टँकर (ए. पी. ३९ / व्ही.ए. ५११७) हा कुर्डूवाडीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेला होता. यावेळी समोरून वेगात येणाऱ्या एका कारला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाने टँकर राँग साईडने आणला. याचवेळी पंढरपूरहून कुर्डूवाडीच्या दिशेने समोरून येणाऱ्या टेम्पो (एम.एच. ०४ / के. यू. ७६७८) ची समोरासमोर जोराची धडक झाली.
या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांच्या बाजूकडील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. टँकर चालक हा गंभीर जखमी झाला तर आयशर कंपनीचा टेम्पो चालक हा किरकोळ जखमी झाला होता. दरम्यान, दोघा जखमींना तातडीने एका ॲम्ब्युलन्सद्वारे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्रथमोपचार करून त्यांना सिव्हिल हाॅस्पिटलला पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान टँकर चालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे अपघात पथकातील प्रमुख हवालदार शिवाजी कांबळे, हवालदार चंद्रकांत रोडे अपघातस्थळी तत्काळ दाखल झाले. यावेळी अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.