- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - रमजानचा एक महिना मुस्लिम बांधवांकडून उपवास ठेवल्यानंतर, आजच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी ईद साजरी करण्यात येते. मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. आज सकाळी सोलापूर शहरातील पाच प्रमुख मैदानावर मुस्लिम बांधवांकडून एकत्रित रमजान ईद नमाज पठण करण्यात आले.
दरम्यान, नमाज पठणानंतर एकमेकांना शुभेच्छा देत ईदचा आनंद व्दिगुणित केला. सोलापूर शहरातील पानगल हायस्कूल येथील शाह आलमगीर इदगाह, आलमगीर इदगाह (होटगी रोड), आदिलशाही इदगाह (जुनी मिल कंपांऊंड), सावरकर (आसार) मैदान व रंगभवन मैदान या प्रमुख पाच मैदानावर बांधवांनी एकत्रित सामुहिक नमाज अदा केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. शिवाय तात्पुरत्या कालावधीसाठी शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
अल्लाह ने रमजान महिन्यात संपूर्ण कुरान या जमिनीवर उतरविले. कुरान च्या माध्यमातून समस्त मानव जाती साठी एकता, भाईचारा व शांततेचं संदेश दिला गेला आहे. आपण नशीबवान आहोत की अल्लाह ने आमच्यासाठी आजचा दिवस ईद च्या माध्यमातून दिला ज्यामुळे कोणीही ना गरीब आहे ना कोणी अमीर; सर्व ईद दिवशी एकाच वेळी एकाच लाईन मध्ये सर्वसमान कोणताही भेदभाव न ठेवता अल्लाह साठी नतमस्तक होतात. जगात शांतता व अखंडता कायम राहो हीच अल्लाह कडे दुआ करण्यात आल्याचे जुनी मिल कंपाउंड येथील आदिलशाही ईदगाह येथील हाफीज सय्यद मोहम्मद यांनी सांगितले.