- रवींद्र देशमुख सोलापूर - दिवाणी न्यायालयात जागेबाबतचा दावा प्रलंबित असतानाही फिर्यादीसोबत विक्रीचा व्यवहार केला. शिवाय बदल्यात इसारा पोटी घेतलेले २५ लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राजेश सिद्रामप्पा पाटील (वय ४७, रा. सुदीप कॉम्पलेक्स, होटगी रोड) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे जागेच्या शोधात होते. तेव्हा आरोपी सुभाष रंगनाथ लोहार याची शिवाजी नगर बाळे येथे जागा असल्याची माहिती पाटील यांना कळाली. त्यानुसार डिसेंबर २०२२ मध्ये बैठकीच्या वेळी दोघांमध्ये त्या जागेचा व्यवहार १२ कोटी रुपयांमध्ये ठरला. इसारा पोटी फिर्यादी पाटील यांनी एक लाख रूपये रोख व २४ लाख रुपये चेकव्दारे आरोपी लोहार यांना दिले. दरम्यान, त्या जागेबाबत आरोपी सुभाष व त्यांचे बंधू यांच्यात वाद सुरू असून त्या संदर्भात सोलापूर दिवाणी कोर्टात वाद सुरू असल्याचे फिर्यादी यांना कळाले. ही बाब आरोपींनी फिर्यादीपासून लपवली. शिवाय इसारा पोटी घेतलेले २५ लाख रुपये परत केले नाही. या प्रकरणी राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष लोहार, भुषण सुभाष लोहार, रत्नकुमार सुभाष लोहार ( रा. सोलापूर ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.