आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या वतीने वनस्पती जनुकीय संवर्धन समूह या देशातील सर्वोच्च पुरस्कारासाठी गोरमाळे (ता़ बार्शी) येथील सीताफळ उत्पादक शेतकरी व एनएमके १ गोल्डन या सीताफळ वाणाचे निर्माते नवनाथ मल्हारी कसपटे यांची निवड झाली आहे़ या पुरस्काराचे वितरण बुधवार, १९ एप्रिल रोजी चंपारन (राज्य : बिहार) येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते व पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ़ आऱआऱहंचनाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे़ दीड लाख रूपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे़ नवी दिल्ली येथील केंद्रीय कृषी मंत्रालय अंतर्गत असलेल्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाच्या वतीने २००७ पासून कृषी वाणाचे संशोधन करणाऱ्या देशातील निवडक शेतकरी व संस्थांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते़ आजपर्यंत महाराष्ट्रात केवळ दोन शेतकरी व एका संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे़ कसपटे हे पुरस्काराचे शेतकरी गटातील तिसरे तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिले मानकरी ठरले आहेत़ या निवडीसाठी राहुरी येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ के़टी़विश्वनाथ, संशोधक संचालक डॉ़ आऱएस़पाटील, बियाणे संशोधन अधिकारी डॉ़ विजय शेलार, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा़ डॉ़ लालासाहेब तांबडे यांनी मार्गदर्शन व पाठपुरावा केला आहे़ कसपटे हे गेल्या ४० वर्षांपासून सीताफळ शेतीमध्ये काम करीत आहेत़ त्यांच्याकडे विविध ४० हून अधिक सीताफळ वाणांचे संकलन आहे़ तर २२ वाणांचे ९ पृथ:करण केले आहे़ आजपर्यंत त्यांनी सीताफळ बागेत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादन केले आहे़
सोलापूरचे शेतकरी नवनाथ कसपटे यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर
By admin | Published: April 10, 2017 5:34 PM