- संताजी शिंदे
सोलापूर - चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ असून जिल्ह्यातील जास्ती जास्त शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. खातेदारांच्याव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधसूचित पिकांची सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी किंवा लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंमलबजावणीकरिता ओरिएंटल इन्सुरन्स कं. लि., मुंबई या विमा कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी www.pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे.