- रवींद्र देशमुखसोलापूर - कत्तलीसाठी म्हणून आणलेल्या देशी गायीसह खोंड, खिलारी कालवड अशा सुमारे १ लाख पाच हजार रुपये किंमतीची गोवंशीय पाच जनावरे पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा शास्त्रीनगर, भगतसिंग मार्केटजवळील पत्रा शेडमध्ये उघडकीस आली. यातील काही जनावरांच्या अंगावर जखमा आहेत. त्यांना हालचाल करता येणार नाही, अशा अवस्थेत पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना खबर मिळताच त्यांनी शुक्रवारच्या रात्री ११:३० च्या दरम्यान घटनास्थळी धाव घेतली.
तेव्हा त्यांना शास्त्री नगर येथल भगतसिंग मार्केटच्या लगत असलेल्या पत्राशेडमध्ये पांढऱ्या रंगाचे खिलारी खोंड, जर्सी बैल, कालवड, खिलारी कालवड, मोठी देशी गाय अशी पाच जनावरे दाटीवाटीनं बांधली होती. त्यांच्या तोंडाला आणि पायाला बांधून हालचाल करता येणार नाही अशा स्थितीत आढळून आली. यातील काही जनावरांना मारल्याचे वळ दिसून आले. ठिकठिकाणी जखमा आढळून आल्या. ही जनावरे कत्तल करण्याच्या हेतूने बांधून ठेवली असल्याचे पोलीस विठ्ठल चिदानंद काळजे (सदर बझार पोलीस ठाणे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या ठिकाणी कोणीही आढळले नाही. सारे पसार झाल्याचे दिसून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरांची किंमत १ लाख ५ हजार रुपये असल्याचे म्हटले आहे.
या कलमान्वये गुन्हाया प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र किपींग ॲन्ड मुव्हमेंट ऑफ केंटल अधिनियम १९७६ चे कलम ३ व १३ तसेच प्रोव्हेसन ऑफ क्रूएलिटी टू ॲनिमल कलम ९, महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ च्या कलमान्वये प्राण्यास क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा १९६० कलमान्वये गुन्हा नोंदला आहे.