सोलापूर : चिमणी पाडकामाबाबतचा निर्णय घेण्याबाबत महापालिका आयुक्त शितल तेली-उगले या सातत्याने टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे सोलापूर विमानसेवेचा विषय पुन्हा पुन्हा लांबणीवर पडत असल्याची टीका सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सोमवारी पत्रकारांसमोर व्यक्त केली.
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने श्री. सिध्देश्वर सह. साखर कारखान्याच्या अनाधिकृत बेकायदेशीर को जनरेशन प्रकल्पावर ४७८ अंतर्गत कारवाई करण्यासंबंधी सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणी घेतल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने तीन महिने उलटून गेले तरी आजतागायत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे सोलापूर विकास मंचने सांगितले.
सोलापूरकरांच्या जनभावनांचा आदर करून चिमणीबाबत तात्काळ निर्णय घेऊन योग्य ती दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यास मदत करावी असेही सोलापूर विकास मंचने म्हटले आहे. याबाबत सोमवारी त्यांनी आयुक्त शितल तेली-उगले यांना निवेदन दिले आहे. यावेळी केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, गणेश पेंनगोंडा, अनंत कुलकर्णी, सुहास भोसले, ॲड. प्रमोद शहा, भारती मन्सावाले आदी उपस्थित होते.