- शीतलकुमार कांबळेसोलापूर - वृद्ध कलावंतांना आधारकार्ड काढताना ठसे उमटत नसल्याने अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने ठसे न उमटणाऱ्या वृद्ध कलावंतांना आधार कार्ड लिंक करण्यापासून सवलत द्यावी, असा ठराव सोलापूर जिल्हा लोक कलावंत संघटनेतर्फे आयोजीत बैठकीत करण्यात आला.
सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेतर्फे रविवार, २ जून रोजी बैठक घेण्यात आली. ही बैठक महापालिकेच्या हिरवळीवर झाली. बैठकीत राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या मानधन वाढीसंबंधी येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत तीन ठराव मांडण्यात आले. शासनाने सरसकट कलावंतांना ५ हजार रुपये मानधन देण्याचे मान्य केले म्हणून अभिनंदन करण्यात आले. ७५ ते ८० दरम्यान असलेल्या वृद्ध कलावंताना आधार कार्डसंबंधी अडचणी आहेत. त्यांना सवलत द्यावी. तसेच संघटनेच्यावतीने कलावंतामध्ये जागृती करण्याचे काम सुरु ठेवाने, असे तीन ठराव मांडण्यात आले.
शासनाने पाच हजारांचे वाढीव मानधन घेण्यासाठी आधार कार्डला मोबाइल नंबर जोडण्याची अट घातली. आधार कार्डला मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी गेले असता, पुन्हा एकदा हातांचे ठसे व डोळ्याचे स्कॅन करणे गरजेचे आहे. मात्र, वय झाल्याने हाताचे ठसे उमटेनात, तर ऑपरेशन झाल्यामुळे डोळ्याचे स्कॅन करता येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली.