सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील अवैध वाळु वाहतुकीवर धाड टाकली. या धाडीत ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरूध्द नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळु वाहतुक होत असल्याची तक्रार पोलीस अधिक्षक यांच्याकडे आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी संबंधित विशेष पथकातील पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पोलीस उपनिरीक्षक दिपक दळवी, अमोल तांबे, पोकॉ आनंद दिगे, पोकॉ अक्षय कांबळे, पोकॉ अमोल देशमुख, पोकॉ मयुर कदम, पोकॉ रवि गटकुळ, पोकॉ अमोल पाटील, योगेश येवले, कोंडीबा मोरे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार शनिवारी पहाटे पेट्रोलिंग करीत असताना डोंबलवाडी हद्दीतील ओढ्यात अवैध वाळु वाहतुक करताना पकडून संबंधित जागेवर असलेली वाहने ताब्यात घेतली.
यात गणेश मारकड, सोमनाथ मोहन ठोंबरे, दत्तू नारायण परशे, संतोष धोंडीराम निकम, माऊली छगन वणवे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यात ४२ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ याप्रकरणाची फिर्याद विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे यांनी करकंब पोलीस ठाण्यात दिली आहे.