सोलापूर : रविवार हा सुट्टीचा दिवस... त्यातच जुळून आलेला लग्नाचा मुहूर्त... नेमका तापमानाचा पारा ४४.३ अंश सेल्सिअसवर पोहोचला अन् वºहाडी मंडळींसह सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. रखरखत्या उन्हाने शहरातील बाजारपेठा ओस पडल्या तर अन्य रस्ते सुनसान दिसत होते. हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यावर दोन-तीन दिवसांपासून उष्णतेपासून बचावचा जागरही होत होता.
शुक्रवारी (२६ एप्रिल) ४४.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाल्यावर शनिवारी मात्र तो पारा खाली जात ४३.१ अंश सेल्सिअस इतका नोंदला गेला. ढगाळ वातावरणामुळे शनिवारचा दिवस सुखावह ठरला तरी रविवारी मात्र सोलापूरकर वाढत्या उन्हाने त्रस्त झाले होते. उष्णतेची लाट येणार असल्याच्या भीतीने बहुतांश मंडळींनी घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे त्याचा बाजारपेठांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख बाजारपेठा अक्षरश: ओस पडल्या होत्या. दुपारी १२ ते दुपारी ४ पर्यंत प्रमुख रस्ते, चौक सुनसान दिसत होते. एप्रिल महिन्यातील रविवार हा शेवटचा दिवस रखरखत्या उन्हाची आठवण करून देणारा ठरला. रविवारचा मुहूर्त साधून अनेक ठिकाणी लग्न कार्ये पार पडली. तापमानाचा पारा वाढल्यावर वºहाडी मंडळींमध्ये अस्वस्थता जाणवत होती.
रविवारी सकाळी ९ वाजल्यापासूनच उकाडा जाणवायला सुरुवात झाली. दुपारी १२ नंतर मात्र उन्हाची तीव्रता वाढू लागली. या वाढत्या उन्हाने घामाचे लोंढे वाहायला सुरुवात झाली. जी काही सोलापूरकर मंडळी घराबाहेर पडली ती टोप्या, गॉगल्स, गमजा घेऊनच. महिला आणि मुलींनी सनकोट परिधान करूनच घराबाहेर पडतानाचे चित्र दिसत होते. काही जण हातरुमाल ओला करून उन्हापासून बचाव करीत होते. दमा, मधुमेह रुग्णासह बालगोपाळ आणि वृद्ध मंडळींनी कूलरसमोर बसून रविवारचा दिवस कसाबसा घालविला.
आजही पारा वाढण्याची शक्यता !- उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने याआधीच दिला आहे. शुक्रवारी आणि रविवारी ४४.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. ३० मेपर्यंत आणि पुढे दोन-तीन दिवस ही लाट असणार आहे. कदाचित उद्या (सोमवारी) तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी बाजारपेठांमध्ये सनकोट, टोप्या, गॉगल्स खरेदीसाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती.