- शीतलकुमार कांबळेसोलापूर - जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांपासून बिबट्या आढळत आहे. या संदर्भात वन विभाग जागृती करत आहे. मात्र, काही लोक सोशल मीडियावरून अफवा पसरवतात, अशांच्या विरोधात वन विभागाकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सध्या अनेक ठिकाणी ऊसतोडणीचे काम सुरू आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार हे उसाच्या शेतामध्ये जातात. बिबट्यादेखील उसाच्या शेतामध्ये राहतो. अनेकदा त्यांची पिल्लेही तिथेच असतात. ऊसतोड करत असताना बिबट्या किंवा त्याची पिल्ले समोर आल्यास एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काय काळजी घ्यावी, याचे पोस्टर तयार करून शेती परिसर, ट्रॅक्टर, कारखाने, आदी ठिकाणी हे पोस्टर लावून जागृती करण्यात येत आहे.
सांगोल्यात झाला होता गुन्हा दाखलमागील महिन्यामध्ये असाच एक प्रकार सांगोला तालुक्यात घडला. गावात वाघ आल्याचा स्टेटस ठेवल्याने हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. वन विभाग अशा घटना घडून लोकांमध्ये दहशत पसरू नये, यासाठी सतर्क आहे. मानव व बिबटे असा वन्यजीव संघर्ष व वन्यप्राण्यांचे रस्ते-अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटना घडू नयेत यासाठी वन विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे.