- विठ्ठल खेळगीसोलापूर : आमच्या उताऱ्यावरून एमआयडीसीची नोंद काढा..अशी विनवणी करीत शेतकरी मुंबईची वाट धरली आहे. बुधवारी सकाळी सोलापुरातून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. सकाळी बैलांना चारा-पाणी करून शेतकरी आता पुढे निघाले आहेत. या बैलगाडी मोर्चामध्ये १२ महिला आहेत. सात आठ लहान मुले आहेत. सुमारे ८० शेतकरी शेतकऱ्यांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे महादेव कुंभार यांची नात आठ महिन्यांची तान्हुली अन्वी रविकांत कुंभार हिचा देखील त्यात समावेश आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीसाठी भूसंपादन केलेल्या सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्यासाठी मागील १७५ दिवसांपासून शेतकरी मंद्रूप ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन केले. मात्र, कोणीच दखल न घेतल्याने वैतागलेले शेतकरी आता मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धडकणार आहेत. बैलगाडी मोर्चा घेऊन हे शेतकरी आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
मंगळवारी मंद्रूपहून निघालेले शेतकरी पहिल्या दिवशी सोलापूरजवळील ए.जी. पाटील कॉलेजसमोरील मैदानावर विसावले होते. बुधवारी सकाळी पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. रात्री अधिकाऱ्यांनी चर्चा केली.. मात्र तोडगा नाहीमंगळवारी रात्री ए.जी.पाटील कॉलेजजवळ शेतकरी मुक्कामाला थांबले होते. तेव्हा एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी जी.एस. कोळेकर यांनी शेतकर्यांची भेट घेतली. १५ दिवस मुदत द्या, बैठक घेऊन तोडगा काढू, अशी विनंती केली. मात्र, शेतकर्यांनी बैठका नको, आता उतार्यांवरून एमआयडीसीची नोंद हटविल्याशिवाय मोर्चा थांबविणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे तोडगा निघाला नाही.