- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - सोलापूर महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या स्मार्ट सिटी आणि अन्य विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. या सर्व कामांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मंगळवार महापालिकेसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त आक्रमक भाषणं उपस्थितांनी केली.
पाथरूट चौक ते गेंट्याल चौक नगरोत्थान रस्त्याच्या कामांची चौकशी व्हावी, मातंग वस्ती सांस्कृतिक भवन हेसुद्धा अंदाजपत्रकाप्रमाणे बांधले गेले नाही. रमाई आवास योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. स्मार्ट सिटीची बहुतेक कामे दर्जाहीन झाली असून, अधिकारीच ठेकेदार आहेत असा आरोप उत्तमप्रकाश खंदारे यांनी केला आहे. याशिवाय कामाचा दर्जा विचारल्यावर अधिकाऱ्यांकडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. शांतीलाल साबळे या युवकावर असले खोटे गुन्हे माहिती अधिकारात माहिती मागविली म्हणून दाखल केले. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही मातंग समाज समितीने निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, युवराज पवार, श्रीकांत देढे, सूर्यकांत केंदळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.